महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आमच महायुती सरकार राबवत आहे. विरोधकांनी या योजनेसंदर्भात कितीही खोटा प्रचार केला तरी त्यांचा डाव आम्ही उधळून लावू, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी या योजनेच्या प्रारंभ प्रसंगी केले. महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी महायुती सरकार ही योजना आणली आहे. ही योजना दोनच महिने चालेल असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. हा खोटा प्रचार करण्याचा विरोधकांचा डाव उधळून लावण्याचं काम आम्ही करतोय.
विरोधक प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीनंतरही ही योजना चालूच असेल असाही विश्वास मंत्री सामंत यांनी दिला. यावेळी माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्राचे प्रतिनिधी स्वरूपात वाटप करण्यात आले. कर्दे येथे घर जळालेल्या पेवेकर कुटुंबीय, पाजपंढरी येथे स्लॅब कोसळून जखमी झालेल्या मालती चौगुले यांना कीट वाटप करण्यात आले. सामंत यांनी शुभमंगल योजना, वयोश्री योजना, तरुणांसाठी जाहीर केलेल्या योजना, तीर्थयात्रा योजना आदींचा उहापोह केला.
अंगणवाडी सेविकांना ३७ लाख मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडसी निर्णय घेऊन अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यांच्या अधिक मानधन वाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अंगणवाडी सेविकांनी माझी लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज ऑनलाईन भरल्यावर पन्नास रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांमध्ये सर्व अर्ज अपलोड झाल्यावर अंगणवाडी सेविकांना ३७ लाख मानधन मिळणार आहे.