मागील सहा महिन्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून चिंचखरी गावात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. आम. प्रसाद लाड यांनी चिंचखरी गावातील सामुहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून, हा विषय सातत्याने जिल्हा प्रशासनापुढे लावून धरला होता. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, नगरसेवक व तालुकासरचिटणीस उमेश कुळकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासह चिंचखरीतील ग्रामस्थ आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
आमदार लाड यांनी या बैठकीत ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकार्यांपुढे मांडल्या आहेत. जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसात खाडीचे पाणी भात शेतीमध्ये शिरल्याने संपूर्ण पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे दरवेळी अश प्रकारच्या नुकसानीला सामोरे जाण्यापेक्षा त्या ठिकाणी खारलॅण्ड बंधारा बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनीही आपल्या समस्या स्पष्टपणे मांडल्या. यावर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी मनरेगा योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारची विविध कामे हाती घेता येऊ शकतात असे सांगितले.
चिंचखरी हे गाव मनरेगातील मॉडेल गाव बनविता येण शक्य होऊ शकेल. त्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये ग्रामस्थांनी आराखडा बनविण्याची तयारी करावी. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मनरेगाच्या अधिकार्यांसह चिंचखरी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शनासाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये मनरेगा अंतर्गत येणाऱ्या शेळीपालन, शेततळी, मत्स्य पालनासाठी आवश्यक पाँड,गट शेतीसाठी चालना देऊन खारलॅण्ड बंधारा बांधणे, गोपालन शेड इत्यादींबाबत माहिती दिली जाईल.
कोकणातून ३३ टक्केच निधी खर्ची पडत असल्याने विकासकामांचे नियोजन करणे गरजेचे आहे. मनरेगांतर्गत जॉबकार्ड काढण्याची ग्रामस्थांनी तयारी करावी. विकासकामांचा आराखडा बनविण्याचे काम प्रशासन करुन घेईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे दिले. परंतु, त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे जरुरीचे आहे असे आमदार लाड यांनी आवर्जून सांगितले.