चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, आणि त्यानंतरच पूररेषा निश्चित करावी, तूर्तास पूररेषेला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी चिपळूणवासियांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली आहे. महसूल मंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची मागणी मान्य केली आहे. मात्र, जोपर्यंत अधिवेशनात अथवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गाळ काढण्यासाठी निधीची ठोस तरतूद होत नाही. तसेच त्याचा आदेश निघत नाही, तोवर उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार चिपळूण बचाव समितीमार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार चिपळूणवासियांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत जिल्ह्यातील चिपळूण दौऱ्यावर आलेल्या यांच्यासमोर पूरग्रस्त महिला सौ. स्वाती खेडेकर-भोजने यांनी आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या कि, कोल्हापूर, सांगलीला वाचविण्यासाठी आमची काशी करू नका. साहेब, तुम्ही महापूर आल्यानंतर येथे आला होतात. तुम्ही सारी परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने अनुभवली आहे. त्यामुळे पुन्हा ती भयानक परिस्थिती उद्भवू नये यासाठी आमच्यावर उपोषणाला बसायची वेळ आली आहे, जि यायला नको होती.
मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा काही चिंता करू नका, तातडीने मदत पुरवू असे सांगितले होते पण त्यांनी सुद्धा काही मदत केलेली नाही. साहेब तुम्हीच आमच्यासाठी कर्तेधर्ते आहात, तुम्हीच आता काहीतरी करा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. महापुरानंतर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भेटीच्या वेळी सुद्धा खेडेकर-भोजने यांनी अशाच पद्धतीने मिडिया समोर आक्रमक होऊन त्यांचा संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा ना. उदय सामंत बचाव समितीच्या व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीने बेधडकपणे आपली भूमिका मांडली आहे. कारण पुरामध्ये सर्वच वाहून गेल्याने, पुन्हा सर्व शून्यातून सुरुवात करणे सगळ्यांसाठीच शक्य नाही आहे.