चिपळूण शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त उभी केली जाणारी वाहने, फेरीवाल्यांची गर्दी आणि अवजड वाहनांची बाजारपेठेत होणारी वर्दळ यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक शाखेकडून काही प्रमाणात नियोजन करण्यात आले असले तरी, पोलिस कर्मचारी थोड्या वेळासाठी हटल्यावर वाहनचालक पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, चिपळूणच्या प्रवेशद्वारापासूनच म्हणजे बहादूरशेख नाक्यापासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या परिस्थितीमुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी जे जोडरस्ते आहेत त्या प्रत्येक जोडरस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास आहे.
गणेशोत्सवामुळे गर्दीत भर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या प्रवाशांची, पर्यटकांची व वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे आधीच अस्ताव्यस्त असलेली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बाजारात पावलापावलांवर वाहतूककोंडी दिसून येत असून, नागरिकांना गाडीतच बराच वेळ थांबावे लागत आहे.
पालिकेकडून केवळ नोटीस – शहरातील अनेक व्यापारीसंकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्यांच्या अटींनुसार पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून वाहतूककोंडी अधिकच गंभीर होत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल ४८ व्यापारीसंकुले व इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे; मात्र पालिकेने अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या या नोटिसीकडे मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केले आहे.
बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांची गर्दी – शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यावर नियोजनाशिवाय चारचाकींची पार्किंग, दुचाकींची रांग तसेच कुठलाही घाक नसलेले फेरीवाले यांच्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. बाजारातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची मनालायेईल तशी उभी केलेली रांग ही समस्येची मुख्य कारणे ठरत आहेत. त्यामुळे अडकलेल्या वाहनांतून हॉर्नचा कर्कश आवाज नागरिकांच्या त्रासात अधिक भर घालत आहे. सामान्य नागरिकांनी पालिका प्रशासन आणि पोलिस विभागाकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, फेरीवाल्यांवर नियंत्रण आणि अवजड वाहनांना बाजारात प्रवेशबंदी ही मागणी जोर धरत आहे अन्यथा वाहतूककोंडीचा प्रश्न अधिकच बळावेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
पार्किंग असलेल्या इमारती – परकार कॉम्प्लेक्स, आयशाबी कॉम्प्लेक्स, देसाई प्लाझा, स्वामी कॉम्प्लेक्स, लोकमित्र कॉम्प्लेक्स, अजिंक्य आर्केड, खेराडे कॉम्प्लेक्स याठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे.
वाहतूक कोंडीची ठिकाणे – बहादूरशेख नाका, शिवाजीनगर बसस्थानक, जिप्सी कॉर्नर, मेहता पेट्रोलपंप परिसर, चिंचनाका, शिवनदी पूल, पालिका परिसर, भाजीमंडई परिसर, गांधीचौक, क्वालिटी बेकरी परिसर, पानगल्ली परिसर, गुहागरनाका परिसर, भेंडीनाका, नाईक कंपनी पूल, गुहागर बायपास प्रेवशद्वार, याठिकाणी मुख्यत्वे वाहतुकीची कोंडी होते.
पालिकेने विकसित केलेले पार्किंग स्थळ – पालिकेने याठिकाणी पार्किंग स्थळ विकसित केले आहे. त्यामध्ये उक्ताड, बुरूमतळी, देसाई मोहल्ला पूल परिसर, भाजीमंडई परिसर खेडेकर क्रीडासंकुल, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसर यांचा समावेश आहे.
पार्किंगमध्ये पावसाळ्यात पाणी – शहरातील अनेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नाही. व्यावसायिक इमारतीही पार्किंगशिवाय उभ्या आहेत. अनेक इमारतींना चक्क जमिनीच्या खाली पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. काही इमारतींना खाली पार्किंगची व्यवस्था आहे; परंतु तिथे पावसाळ्यात गटाराचे पाणी पार्किंगमध्ये येऊन तळे तयार होत आहे. वाहने कुठे पार्क करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकेरी वाहतुकीचे फलक शोभेसाठी – अर्बन बँकेसमोरील दोन्ही मार्ग एकेरी आहेत. खाटिक आळीतून भाजीमंडईच्या मागील बाजूने येणारा रस्ता, वडनाक्यातून येणारा रस्ता, भेंडीनाक्यातून शहराकडे येणारा रस्ता असे काही मार्ग एकेरी आहेत. त्या ठिकाणी दुहेरी वाहतूक होते. त्यामुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी लावलेले एकेरी वाहतुकीचे फलक शोभेचे बाहुले झाले आहेत.
वाहतूक कोंडीचे कारण – ग्रामीण आणि उपनगरातून विविध कामानिमित्ताने ग्रामस्थांची शहरात नेहमीच ये-जा असते. हे लोक अनेकवेळा स्वतःची वा भाड्याची वाहने घेऊन येतात. शहरात जिथे मोकळी आणि मोक्याची जागा दिसेल त्या ठिकाणी ही वाहने उभी करून ठेवतात. अनेकवेळा बाजारपेठेमध्ये, नजीक मोक्याची किंवा मोकळी पार्किंगसाठी जागा नसल्याने बाजारपेठेमध्ये रस्त्यावर वाहनचालकांकडून वाहने उभी करून ठेवली जातात. मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांची वाहनेसुद्धा रस्त्यावर एकाच ठिकाणी तासनतास उभी राहिल्याने वाहतूककोंडीला आमंत्रण मिळते.