27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...
HomeChiplunचिपळूण शहराला महापुराचा धोका कायम…

चिपळूण शहराला महापुराचा धोका कायम…

संबंधितांना प्रशासनामार्फत स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यानुसार तालुक्यातील १५ गावांमधील ३६६ कुटुंबांना दरडीचा व पुराचा धोका आहे. संबंधितांना प्रशासनामार्फत स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र येथे पावसाचा जोर वाढलेला असतानाही काही ठरावीक कुटुंब वगळता बहुतांशी धोकादायक स्थितीतील कुटुंबांच्या स्थलांतराबाबत अद्याप कार्यवाहीच झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे. पूरपरिस्थितीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने तसेच कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधीक्षक अभियंत्यांना पूरपरिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

मागील आठवड्यात येथे काहीशी पूरसदृश स्थिती आली असताना कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजेनकोच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून काही तास पाणी रोखण्यात आले. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. वाशिष्ठी व शिव नदीला इशारा पातळीही गाठता आली नाही. आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत ग्रामीण भागातही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरडग्रस्त गावांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये पेढे, परशुराम घाट, तिवरे (गावठाणवाडी, फणसवाडी), तिवडी (उगवत वाडी), पेढांबे (रिंगी धनगरवाडी), येगाव, कामथे खुर्द, कापसाळ, गोवळकोट, मिरजोळी, कळकवणे, आकले, कोळकेवाडी, पोफळी, कळंबट व वीर आदी ठिकाणी दरडीचा धोका आहे. मात्र अद्याप संबंधित गावातील धोकादायक स्थितीतील कुटुंबांना स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परशुराम घाटाच्या पायथ्याशी चिखल आल्याने काही घरांना धोका निर्माण झाला आहे. तेथेही स्थलांतराची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular