भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस देशभर बालदिन म्हणून साजरा होत असताना, सुनील बक्षी नामक माथेफिरू इसमाने फेसबुकवर नेहरूंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यासंदर्भात काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या नेत्यांपैकीच पंडित नेहरू हे एक. आबाल वृद्धांपासून सर्वांनाच त्यांचा सार्थ अभिमान आहे. मात्र सुनील बक्षी या व्यक्तीने पंडित नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून ते सार्वजनिक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून जिल्हाभरातून प्रचंड संताप उफाळत आहे. सुनील बक्षी या माथेफिरूवर आपण तातडीने कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे अशा महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आपल्याकडून तातडीने कारवाई न झाल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. या तक्रारीसोबत सुनील बक्षी याने केलेली पोस्ट, लिंक आणि त्याच्या फेसबुक अकाऊंटची माहितीही काँग्रेसतर्फे पोलिसांना देण्यात आली.
चिपळूणचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना यासंदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले असून, पोलिसांनी त्या संबंधित माथेफिरू व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसतर्फे श्री. यादव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबरला देशभर बालदिन म्हणून साजरा करण्यात आला.
देशासाठी बलिदान देणाऱ्या महान नेत्यांसह काँग्रेसच्या विविध नेत्यांवर आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे प्रमाण वाढत आहे. काँग्रेसने आतापर्यंत नेहमीच संयमाची भूमिका घेतली. मात्र आता संयमाची हद्द संपली आहे. यापुढे अशा पोस्ट करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. असा इशारा प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.