चिपळूण/डेरवण: अंगावर काटा आणणारी आणि तितकीच काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना महाड आणि चिपळूण परिसरात घडली आहे. रात्रीच्या गाढ अंधारात झोपेत असलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला अत्यंत विषारी अशा ‘फुरसे’ सापाने दंश केला. मात्र, काळाचा घाला वेळेवर आलेल्या डॉक्टरांच्या रूपाने टळला. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील प्रसिद्ध बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील १२ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने अहोरात्र मेहनत घेत या चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. डॉक्टरांच्या या अभूतपूर्व यशाने बाळाच्या पालकांना जणू स्वर्गाचे सुख लाभले असून संपूर्ण परिसरातून वैद्यकीय पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पहाटेच्या गाढ झोपेत काळ बनून आलं ‘फुरसे’! ही थरारक घटना घडली महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथे. सम्रान सागर गोलांबडे हे अवघे ६ महिन्यांचे बाळ गेल्या २३ तारखेला पहाटे आपल्या आई-वडिलांच्या कुशीत गाढ झोपले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक बाळ वेदनेने प्रचंड जोरात रडू लागले. बाळाच्या किंचाळण्याने आई-वडील दचकून जागे झाले. त्यांनी तातडीने आजूबाजूला पाहिले असता, खाटेजवळ अत्यंत विषारी समजला जाणारा ‘फुरसे’ (Saw-scaled Viper) जातीचा सर्प सरपटताना दिसला. भीतीने पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने बाळाची तपासणी केली, तेव्हा डाव्या काखेच्या भागात सापाच्या दंशाची खुण (Fangs Mark) स्पष्ट दिसत होती. बघता बघता त्या भागातून रक्तस्राव सुरू झाला आणि तिथे मोठी सूज येऊ लागली.
महाड ते डेरवण; काळजाचा ठोका चुकवणारा प्रवास बाळाचे वय अतिशय लहान असल्याने विषाचा परिणाम वेगाने होण्याची भीती होती. पालकांनी एक क्षणही वाया न घालवता बाळाला तातडीने महाड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासणीत सापाच्या विषामुळे बाळाच्या शरीरात गंभीर रक्तविषारी (Hemotoxic) परिणाम झाल्याचे समोर आले. म्हणजेच विष रक्तामध्ये पसरू लागले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आणि बाळाची प्रकृती वेगाने खालावत असल्याने, डॉक्टरांनी त्याला तातडीने सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
१२ डॉक्टरांचे पथक बनले ‘देवदूत’ बाळाला गंभीर अवस्थेत घेऊन कुटुंबीय जेव्हा डेरवण रुग्णालयात पोहोचले, तेव्हा तिथल्या वैद्यकीय यंत्रणेने तातडीने हालचाली सुरू केल्या. बाळाला थेट बाल अतिदक्षता विभागात (NICU/PICU) दाखल करण्यात आले. ६ महिन्यांच्या कोवळ्या जिवावर प्रतिविषाचा (Anti Snake Venom – ASV) प्रयोग करणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. डोसचे प्रमाण आणि बाळाचा प्रतिसाद यावर त्याचे प्राण अवलंबून होते.
रुग्णालयातील १२ तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आणि रात्री-अपरात्री दक्ष असणाऱ्या परिचारिकांनी २४ तास बाळावर बारकाईने लक्ष ठेवले. अखेर डॉक्टरांचे प्रयत्न आणि पालकांची प्रार्थना फळाला आली. शरीरातील विषाचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि चिमुकल्या सम्रानची प्रकृती धोक्याबाहेर आली. बाळ पूर्णपणे बरे झाल्यावर त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.
या मोहिमेत डॉ. अनिल कुर्णे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. मोहित कडू, डॉ. विशाखा संकपाळ, डॉ. पंक्ति मेहता, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. प्रतीक गोडसे, डॉ. विवेक सूर्यवंशी, डॉ. प्रिया वाघमारे, डॉ. विवेक पवार, डॉ. प्रणय गावंडे आणि डॉ. अजय पाटील या १२ डॉक्टरांच्या पथकाने मोलाचे योगदान देऊन एका निष्पाप जिवाला नवजीवन दिले.

