चिपळूण तालुक्यात मध्यंतरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. काही दिवसांच्या फरकाने लहान मोठ्या चोऱ्या घडत होत्या. त्यामुळे पोलिसांसमोर एक प्रकारचे या भुरट्या चोरांना पकडण्याचे आवाहनच उभे राहिले होते. अखेर पोलिसांनी आपली टीम कामाला लावून चोराला पकडण्यात यश मिळवले आहे.
चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील बंद घर फोडून सुमारे ४२ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरी करणारा संशयित आरोपी लोकेश रावसाहेब लोकरे तर सायकल चोरटा सुरेंद्र काशिनाथ जाधव वय ४२ याला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. शंकर गणपतराव झोरे वय ५२, रा. कापसाळ यांचे बंद घर दि. १ एप्रिल २०२२ रोजी चोरट्याने दाराची कडी तोडून लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेली ४१ हजार ७०० रुपये किमतीची एक तुटलेली सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास केली होती.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन आरोपी लोकेश रावसाहेब लोकरे वय २८, रा. खटाव रस्ता, पाटील मळा, लिंगनूर, ता. मिरज यास अटक करुन चोरीस गेलेली सोन्याची बांगडी हस्तगत केली आहे.
त्यासोबतच नुकतीच झालेली अजून एक चोरी उघडकीस आली आहे. डीबीजे महाविद्यालयासमोरील शिरीष पांडुरंग पालकर यांच्या मालकीची १३ जून रोजी २ हजार किमतीची सायकल चोरीस गेली होती. याची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याबाबत तपासाअंती धामणवणे बौद्धवाडी येथील सुरेंद्र काशिनाथ जाधव यास अटक करून चोरीस गेलेली सायकल हस्तगत करण्यात आली आहे.