रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील सर्व बाजारपेठेतील व्यापार्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली असून, व्यापारी वर्गातून मिळणारा प्रतिसाद सुद्धा उत्तम आहे. रत्नागिरी चौथ्या टप्प्यात अनलॉक झाल्यापासून, चिपळूण बाजारपेठ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येते. सकाळपासून बाजारपेठेमध्ये गर्दीचे प्रमाण जास्त असल्याने, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एक खबरदारीचे उचललेले पाऊल म्हणून सर्व व्यापारी आणि दुकानात काम करणारे कर्मचारी यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एन.बी.पाटील यांनी चिपळूण मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता, संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोरोना चाचणीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार येथील बाजारपेठेत व्यापारी व कामगारांची शनिवारपासून कोरोना चाचणीसाठी मोहीम राबविण्यात आली. त्याला व्यापारी व कामगारांनीही सहकार्य केले आहे.
व्यापार्यांच्या सोयीसाठी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी चाचणी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी मेजर कलेक्शन, जयंत साडी सेंटर, जुना एस.टी.स्टँड शेजारी आणि गांधी चौक या ठिकाणी तपासणी केंद्रामध्ये उपस्थित असून, सर्व व्यापारी आणि कर्मचार्यांनी याचा लाभ घ्यावा, असे व्यापारी संघटनेने आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेमध्ये सदर तपासणी केंद्र सुरु असणार आहे.
त्याचप्रमाणे २५ जुलैपासून नगर परिषद आणि पोलीस प्रशासन प्रत्येक दुकानात जाऊन दुकान मालक आणि कर्मचार्यांची चाचणी झाली कि नाही याची चौकशी करणार आहेत, जर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देऊन सुद्धा जर चाचणी करण्यात कोणी दिरंगाई करत असेल, तर दुकान बंद ठेवण्याचे आदेश जरी करण्यात येणार आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी आणि कर्मचार्यांनी चाचणी केलेली असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे जिल्हा शासनाने जाहीर केले आहे.