चिपळूण न.प. निवडणुकीचे वादळ चिपळूण शहरात घोंगावू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपली राजकीय ताकद व अस्तित्त्व दाखवण्याची रस्सीखेच सुरू झाली आहे. या निवडणुकीला चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दोन माजी आमदार एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून या बाबतची चर्चादेखील जोरदारपणे सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आ. रमेश कदम तर शिवसेनेचे शिंदे गटातील माजी आ. सदानंद चव्हाण आपल्या समर्थकांसह एकत्र येऊन न.प.ची निवडणूक लढविणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.
चिपळूण नगर परिषदेवर राजकीय सत्ता वर्चस्वासाठी सर्व पक्षातील बडे राजकीय नेते स्वत:चे अस्तित्त्व आणि ताकद पणाला लावत आहेत. गेल्या सुमारे ३०-३५ वर्षांच्या राजकीय सत्ता परिवर्तन बदलांचा अंदाज घेतला असता राष्ट्रवादीने बहुतांश काळ न.प.वर सत्ता वर्चस्व ठेवले.
तर शिवसेनेने स्वत:ची ताकद शहरात निर्माण करून सत्ताधार्यांवर जम बसवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्या मानाने काँग्रेसने मागील निवडणूक वगळता स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला. तर भाजपला केवळ मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या रूपाने जनमताचा आधार मिळाला आहे.
राष्ट्रवादीमध्ये आजी-माजी आमदारांचे गट, शिवसेनेमध्ये शिंदे समर्थक व ठाकरे समर्थक गट, मूळ शिवसेनेतील गटबाजीचा फटका देखील संघटनेला बसू शकतो. तर त्यातीलच काही छुपे शिंदे समर्थक सेनेला धोका देऊ शकतात. नगरसेवक पदासाठीही अनेकजण इच्छुक होत आहेत. त्यातच सर्व पक्षात गटबाजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपमध्ये देखील माजी खा. राणे समर्थक व मूळ भाजप परिवार गट तर काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांचे स्वतंत्र गट असे सध्या राजकीय गटबाजीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या सर्वातून वेगळी आडवाट काढण्याचे राजकीय डावपेच माजी आ. रमेश कदम यांनी सुरू केले आहेत.