येथील शहराच्या विकासासाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेची इमारत मोडकळीस आली आहे. सध्या ती धोकादायक बनली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात निधी उपलब्ध झाला नाही. आता पालिका प्रशासनानेच मुख्य इमारतीचा मागील भाग धोकादायक बनला असल्याचा फलक मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे लावण्यात आला आहे. त्यामुळे चिपळूण शहर विकासाच्या गप्पा पोकळ असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या इमारतीचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिले होते. तूर्तास या इमारतीच्या परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे.
पालिकेच्या दोन्ही इमारतीही आता जुन्या झाल्या आहेत. ज्या इमारतीमधून शहर विकासासाठी जातो त्याच इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे सुरवातीपासून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दोन्ही इमारतीचा काही भाग ढासळू लागला आहे. अनेक विभागात पावसाळ्यात गळती लागत आहे. इमारतीचा लाकडी जीनाही हलत होता. गतवर्षी मुख्य इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; परंतु, मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेली उपइमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या भागांत कोणीही जाऊ नये, अशा प्रकारचे फलक इमारतीच्या खाली लावण्यात आले आहे.