शहरात महिन्याभरापूर्वी नगरपालिकेने हातगाडी व खोकेधारकांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. सुमारे दिडशेहून अधिक जणांवर या मोहिमेत कारवाई करण्यात आली. काहींचे साहित्यही जप्त केले होते. तसेच जेसीबीच्या साह्याने पक्के बांधकामदेखील पाडले होते, याशिवाय मध्यवर्ती बसस्थानकासमोर रस्त्यालगत मोठ्या संख्येने हातगाड्या सुरू होत्या. त्या ठिकाणी जेसीबीने गटार काढून हातगाड्या लावण्यास मनाई केली होती. तेव्हापासून या परिसरात हातगाडीधारक व खोकेधारक व्यवसाय करण्यास धजावत नव्हते; मात्र एक-दोन व्यावसायिकांनी गटाराच्या पलीकडे हातगाडी उभी केल्याने अन्य काही हातगाडीधारकही तेथे सरसावले. त्यातूनच दोन हातगाडीधारकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील झळकला. त्यावरून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने प्रशासनाने पुन्हा कारवाई करण्याचे ठरवले. सोमवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाईसाठी जेसीबीसह पालिकेची यंत्रणा दाखल झाली. त्यामुळे संबंधित हातगाडीधारकांची साहित्य हटवताना तारांबळ उडाली. यंत्रणा पोहोचण्याआधीच काहींनी खोके हटवले होते. या कारवाईमुळे बसस्थानकासमोरील परिसर चकाचक झाला.
पुन्हा कारवाई करणार – चिपळूण पालिकेने त्या हातगाडीधारकांवर कारवाई केली. त्यानंतर अनेकांनी साहित्यासह तेथून पळ काढला. त्यामुळे ही कारवाई तात्पुरती स्थगित केली असली तरी गरजेनुसार पुन्हा तीव्र करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.