चिपळूण शिरगाव परिसरातील तळसर-बौद्धवाडी पुलाजवळ दुचाकीवरून तीन मित्र रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जात असताना एकाच्या हातातील बंदूक खाली पडली. आणि त्यातून सुटलेल्या एकापाठोपाठ एका छऱ्याने एकाच्या शरीरात तर बाकी दोघांच्या हातात आणि डोक्यात छर्र्ये लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये शिरगाव येथील तुषार विश्वास साळुंखे या युवकाचा नाहक बळी गेला आहे. दुसरा गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. हे तिघे घरात खोट सांगून शिकारीला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तरुणाला गोळी लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार विश्वास साळुंखे वय २०, रा. शिरगाव असे असून त्याच्या सोबत शुभम दिनकर नलावडे वय २०, रा. शिरगाव व निखिल बळवंत राजेशिर्के वय २२, रा. तळसर हे दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हे तीन मित्र घरी क्रिकेट स्पर्धेसाठी जातो, असे सांगून शनिवारी रात्री घराबाहेर पडले. त्यानंतर हे तिघेजण नजीकच्या तळसर परिसरातील जंगलात एका दुचाकीने शिकारीला गेले. याचवेळी बंदूक पडल्याने त्यातून सुटलेल्या बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन मित्र देखील गंभीरपणे जखमी झाले आहेत.
तळसर परिसरातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या या तरुणाचा मृत्यू झालेला तुषारला तळसर येथून शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तुषार साळुंखे घरात आणि आपल्या मित्र परिवारामध्ये सर्वांच्याच जवळचा होता. त्याच्या अचानक अशा प्रकारे जाण्याने अनेकांच्या मनाला एक प्रकारे धक्का बसला आहे. अत्यंत शोकाकुल वातावरण त्याच्यावर शिरगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.