चिपळूण शहरामध्ये नद्यांचा गाळ उपसा आणि नद्यांमधील बेटे काढण्याचे वेगाने सुरु आहे. नाम फाऊंडेशनचे कर्मचारी पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जोमाने कामाला लागले आहेत. नाम फाउंडेशनच्या सहकार्याने नदीमधील अनेक वर्ष न काढलेला गाळ काढण्यास मदत होत आहे. चिपळूण शहरात नाम फाऊंडेशनकडून शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरु असतानाच एक पोकलेन नदीपात्रात कलंडला. परंतु, जागरूक राहिल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
नाम फाउंडेशनतर्फे आतापर्यंत साधारण ५० टक्के नदीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण केले आहे. यंत्रणेतील कर्मचारीही दिवसरात्र राबत असून, आपला जीव धोक्यात घालून पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. सद्यस्थितीमध्ये नाम फाऊंडेशनतर्फे वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपसा करण्याचे काम एकाच वेळी सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी चार पोकलेन, पाच डंपर व जेसीबी अशी यंत्रणा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे, इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने, नाम फाऊंडेशनने इंधनासाठी चिपळूण वासियांना आर्थिक मदतीचे आव्हान केले आहे.
येथील महर्षी कर्वे भाजी मंडईच्या मागील बाजूस खाटीक आळी परिसरातील शिवनदीत दुपारी गाळ काढण्याचे काम सुरू होते. अशातच एक पोकलेन नदी काठावरून थेट पात्रात कोसळला. त्याठिकाणी पाणीही खूप होते. त्यामध्ये अर्धा पोकलेन बुडाला. सुदैवाने चालक तितक्याच तत्परतेने केबीनमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रसंगावधान राखल्याने पोकलेन चालकाचा जीव वाचला आहे. त्यानंतर पाण्यात बुडालेली पोकलेन बाहेर काढण्यासाठी अन्य दोन पोकलेनची मदत घेण्यात आली.