चिपळूण नगर पालिकेने २००५ साली आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले होते. दरवर्षी नदीपात्रातील गाळ काढून तो किनाऱ्यावरच ठेवला जात असल्याने, पावसाळ्यात किनाऱ्यावरील गाळ पुन्हा नदीपात्रात येऊन नदीच्या गाळात भर पडत होती. फार वर्षांपूर्वी शिवनदीचे पात्र एकदम खोल होते. नदीपात्रामध्ये बोटीचा वावर होता, एवढ्या पातळीपर्यंत पाणी होते. परंतु, मागील काही वर्षे नदीतील गाळ साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि नदीकिनारच्या भागामध्ये झाडेझुडपे देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या नदीतून बोटीने प्रवास करणे हे अशक्यच झाले होते.
जेंव्हा जुलै २०२१ मध्ये चिपळूण शहरात २००५ ची पुनरावृत्ती झाली, महाप्रलयंकारी आला, त्यानंतर शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नागरिकांमधून आंदोलन करण्यास सुरुवात झाली. शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ करण्यासाठी निधीची तरतूद केली. त्याचप्रमाणे पालिकेनेही नदीतील गाळ करण्यासाठी निधीची तरतूद केली. नाम फाउंडेशन आणि चिपळूणमधील स्वयंसेवी संस्थांनी गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बऱ्याच प्रमाणात मदत केली. त्यामुळे मागील चार महिने वाशिष्ठी आणि शिवनदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
शहरातील खाटिक आळी येथे वाशिष्ठी नदीला शिवनदी येऊन मिळते. आता शिवनदीतील गाळ काढल्यानंतर नदीपात्रात पुन्हा एकदा बोटी धावू लागल्या आहेत. यातून शिवनदीचे पात्र खोल झाल्याने बोट वाहतूक सुद्धा पुन्हा सुरु होऊ शकणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी शिवनदी सज्ज झाल्याचे यातून स्पष्ट होते आहे. आपत्ती काळात बोटी चालवण्याची रंगीत तालीम आज शिवनदीमध्ये घेण्यात आली.
पूर्वी शिव आणि वाशिष्ठी नदीत पूर्वी व्यावसायिक बोटी चालायच्या. व्यापाऱ्यांचे साहित्य बोटीतून चिपळूणला आणले जायचे. दोन्ही नदीचे पातळी गाळाने भरल्यानंतर व्यापारी वाहतूक बंद करण्यात आली. शहरात पूर येऊ नये, म्हणून पालिकेने नदीतील गाळ उपसा केला. त्यामुळे आता नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.