आज सकाळपासून चिपळूण शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स झळकत होते. महापुराच्या काळात त्यांनी केलेल्या अमुल्य मदतीबद्दल चिपळूण मधील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले होते. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे बॅनर शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी लावले होते.
चिपळूण शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ व काही पदाधिकाऱ्यांचे फोटो या बॅनरवर लावण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात हे पोस्टर झळकत होते. उमेश सकपाळ हे एकनाथ शिंदे व उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या बॅनरवर सर्वात वरच्या स्थानावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही फ़ोटो असल्याने शिवसेनेच्या प्रोटोकॉल प्रमाणे हा बॅनर असल्याचे दिसून आले आहे.
पण हे शिंदेच्या समर्थनाचे बॅनर्स एका रात्रीमध्येच गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘चिपळूणला उभारी देणारे मदतीचे हाथ मा. ना.एकनाथ शिंदे यांची साथ’ असा एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारा मजकूर बॅनरवर होता. ते बॅनर कोणी काढले यावर तर्कवितर्क सुरु आहेत. त्यामुळे आता या सगळयावरून येथील राजकीय वातावरण तापण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
त्यामुळे चिपळूण पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, त्या ठिकाणी राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पण, सध्या असे काही प्रक्षोभक घडून न येता, शांततेच वातावरण आहे. या सगळ्याबाबत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्याकडून ११ वाजता शिवसेनेकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान खेड मध्येही रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे याना साथ देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. खेड शिवसेनेतील रामदास कदम विरोधी गटाचे काही ज्येष्ठ कायकर्ते यांची बैठक होणार असून त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे राजकीय तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत.