मागील महिनाभर सावकारी धंद्याच्या विरोधात चिपळूणवासीय आक्रमक झाले आहेत. सावकारांची सर्व सामान्य जनतेसोबत सुरु असलेल्या पिळवणूकी बद्दल पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सहायक निबंधक कार्यालयाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, जनतेला सुद्धा कोणतीही आर्थिक पिळवणूक सहन न करता, कार्यालयाशी संपर्क करण्यास सांगितले आहे.
पोलीस आणि सहायक निबंधक कार्यालयाने केलेल्या आवाहनावरून दोन तीन तक्रारी दाखल झाल्या , त्यावरून सावकारी करताना अधिकची रक्कम वसूल केल्याप्रकरणी पूजा मिरगल, चांगदेव खंडझोडे, शिवा खंडझोडे या तिघांवर खंडणी मागितल्या प्रकरणी, तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेच्या भीतीने तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.
पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दोन पथके तयार करून गुन्हा दाखल झालेल्या दोन सावकारांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकला व तपासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले. तसेच तेथील सहायक निबंधक कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यामुळे शहरी भागातील सावकारांमध्ये घबराट पसरली आहे. काही सावकारांनी जप्त केलेली वाहने परत केल्याचे वृत्त कानावर आले आहे तर काही सावकारांनी जे कोरे चेक सामान्य जनतेकडून घेतले होतेत, ते सुद्धा परत करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त साहित्य जप्त करू नका, तर सावकारांची अवैध बँक खात्यांची चौकशी करून ती सील करा, अशी मागणी आक्रमक झालेल्या जनतेने केली आहे.