सध्या सर्वत्रच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्याने, बँक आणि पोलीस कायमच व्यवसाय करताना सतर्कता बाळगायला सांगत असतात. कारण ऑनलीन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मागील काही महिन्यामध्ये बँकमधील कर्मचारीच काही न काही अपहार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील घबराटीचे वातावरण पसरले आहे.
चिपळूण शाखेतील सर्वसामान्य नागरिकांची हक्काची बँक म्हणून ओळख असलेल्या चिपळूण अर्बन बॅँकेतील तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन पध्दतीने रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने अपहाराची कबुली दिली असून, त्यातील काही रक्कम बँकेकडून वसूल देखील करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असून लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये दिली आहे. या अपहारामुळे सभासदांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे.
बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण अर्बन बँकेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. गेल्या काही दिवसांपासून चिपळूण अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची चर्चा सुरू होती. सभेमध्ये बँकेचे अध्यक्षानी घडलेल्या अपहाराबाबतची माहिती सर्वाना दिली. अपहाराबाबत कर्मचाऱ्याने कबुली दिली असून, त्यातील काही रक्कम बँकेने वसूल केली असून त्या व्यतिरिक्त अन्य काही अपहार झाले आहेत का, किंवा त्या कर्मचार्याच्या हातून केले गेले आहेत का ! याची खातरजमा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर अपहाराबद्दल इत्यंभूत माहिती मिळून, संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.