23.2 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeChiplunप्लास्टिकमुक्तीसाठी चिपळूणकर एकवटले, सव्वासहा टन कचरा संकलन

प्लास्टिकमुक्तीसाठी चिपळूणकर एकवटले, सव्वासहा टन कचरा संकलन

शाळा, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकसह सुमारे ३ हजार लोकांनी स्वच्छता केली.

शहरातील रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, गटारात अडकलेले कागद व प्लास्टिक बाटल्या यासह अन्य प्लास्टिक कचरा संकलनासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या आवाहनाला चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्यासह सुमारे ३ हजार लोकांनी शहरात ११ ठिकाणी स्वच्छता केली. शुक्रवारी (ता. २०) सकाळी दोन तास रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी सव्वासहा टन प्लास्टिक कचरा गोळा केला. प्रांताधिकारी कार्यालय, चिपळूण नगरपालिका व प्रशासन यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत लिगाडे व भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहरात आज सकाळी ८ वाजता एकाचवेळी ११ ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी अकरा टीम तयार करण्यात आल्या होत्या. चिपळूणमधील १३ शाळांमधील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते.

मराठी अभिनेता ओंकार भोजने यांनी चिपळूण पालिकेच्या घंटागाडीतून जनजागृती करत व्यापाऱ्यांना प्लास्टिकमुक्तीचे पत्रक वाटप केले. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही शहरात फिरले. ही मोहीम राबवत असताना चिपळूण नगरपालिकेने शहरात “नो प्लास्टिक झोन’ची घोषणा केली आहे. चिपळूण शहराच्या पूरमुक्तीकरिता प्रशासनाकडून छोटे-मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी प्लास्टिक संकलन मोहीम हा एक आहे. पुराच्या पाण्यासोबत वाहत जाणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या, रॅपर्स आदी कचरा आजच्या या सामूहिक स्वच्छता मोहिमेत गोळा करण्यात आला. गोळा केलेल्या कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. त्यासाठी पालिकेच्या घंटागाड्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या.

भोजने यांना स्वच्छतेचा अधिकृत ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी ते म्हणाले, मी केवळ ब्रँड अँबेसिडर नसून, या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. चिपळूणमधील प्रत्येक सुजाण नागरिक या मोहिमेचा खरा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी नसून, प्रत्येकाची व्यक्तिगत बांधिलकी आहे. तरुणांनी कला, साहित्य, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतून पुढे येऊन स्वच्छतेच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या समारोप कार्यक्रमावेळी आमदार शेखर निकम यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, या मोहिमेतील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छतेविषयी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेऊन प्रशासनाने जनजागृती करावी. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू.

स्वच्छता समारोपावेळी गांधारेश्वर तिठा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी डॉ. यतीन जाधव, प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक आशिष खातू, रामशेठ रेडीज, सीमा चाळके, मनोज शिंदे, रसिका देवळेकर, मिलिंद कापडी, शहानवाज शहा आदी उपस्थित होते. त्यानंतर कळंबस्ते येथे लिगाडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या देवराईला भोजने यांनी भेट दिली. या सूत्रसंचालन सुजित जाधव यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular