रत्नागिरी चिपळूण मधील सर्वात चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे सावकारी धंद्याला चढलेला जोम. प्रत्येक उद्योग धंद्याचे काही ठराविक नियम आणि निर्बंध असतात. पण जर त्याशिवाय जर अतिशयोक्ती झालीच तर त्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. जनतेचे रौद्र रूप बघून सावकारांना पळता भुई थोडी झाली आहे.
चिपळूणमध्ये राजरोस सुरु असलेल्या सावकारांच्या पिळवणुकीला कंटाळून एक व्यक्ती आत्महत्या करते, तेंव्हा शासनाला जाग येते. आत्महत्त्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये सावकारांच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे निष्पन्न होते. सावकारांची नावे देखील चिठ्ठीमध्ये नमूद केलेली असून शासन का कारवाई करत नाही !
गुरव नामक व्यक्तीची आत्महत्या, एका महिलेला केली गेलेली मारहाण तरीही बिनधास्त सुरु असलेली दादागिरी, अशा सावकारांविरोधात चिपळूणमधील गुरव समाज संघटना आणि इतर जनता एकवटली असून, पोलीस स्थानकामध्ये जाऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलीस स्थानकानंतर गुरव समाज बांधव आणि उर्वरित जनता यांनी आपला मोर्चा उपनिबंधक कार्यालयाकडे नेला आणि तेथील अधिकार्यांना घेराव घालून सर्व कहाणी सांगून, संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी निवेदन देऊन मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे उपस्थित जनतेने सावकारी धंद्याबद्दलची सहाय्यक निबंधकांकडून सविस्तर माहिती घेऊन, चिपळूणमधील परवानाधारक आणि विना परवाना असेलेले सावकारांबद्द्ल जाणून घेतले. त्या धंद्याबद्दलचे नियम, किती टक्के व्याज दर ते आकारू शकतात, कोऱ्या बॉंड पेपर वर सही का घेतली जाते, कोरा चेक का घेतात, एखादी मौल्यवान वस्तू, वाहन यांवर ते जप्ती आणू शकतात कि नाही! त्यांना तसा अधिकार आहे का? इत्यादी सर्व माहिती सहाय्यक निबंधक यांनी जनतेला सांगून जागरूक केले.