शहरातील मुरादपूर येथील महावितरणच्या सबस्टेशनात सातत्याने होणारा बिघाड, अतिरिक्त भार, तसेच व्यापाऱ्यांना आकारले जाणारे वाढीव दर यावरून व्यापारी व नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. याचवेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनाही शहरातील विस्तीर्ण रस्ते व अन्य सुविधा देण्यासंदर्भात सूचना केली. अध्यक्षस्थानी असलेल्या आमदार शेखर निकम यांनी व्यापारी व नागरिकांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन दोन्ही विभागांनी कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. महावितरण व नगरपरिषद संबंधितव्यापारी व नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आमदार निकम यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. बाजारपेठेतील आदर्श हॉटेलच्या सावरकर सभागृहात झालेल्या या बैठकीला व्यापारी व शहराच्या विविध विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, उमेश काटकर यांनी मुरादपूर येथील सबस्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने त्याचा फटका बाजारपेठेतील व्यापारी व परिसरातील नागरिकांना नेहमी बसतो आहे.
त्यासाठी या सबस्टेशनवर असलेला अतिरिक्त भार कमी करावा, तसेच सबस्टेशनच्या पर्यायी जागेसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यावर महावितरणचे अधिकारी माने यांनी या सबस्टेशनबाबतचा अहवाल लवकरच सादर करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्याशिवाय महावितरणच्या ठेकेदारामार्फत होणाऱ्या कामांवर लक्ष दिले जात नाही. कार्यालयात अधिकारी उपस्थित नसतात, तक्रारीबाबतचा दूरध्वनी कायम बंद असतो. शहरातील विविध भागात विद्युत रोहित्रांची अवस्था वाईट का आहे, असे एकापेक्षा एक प्रश्न विचारण्यात आले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सूचनेप्रमाणे कारभारात सुधारणा केली जाईल, तसेच नागरिकांच्या संपर्कासाठी चार क्रमांक उपलब्ध केले जातील, वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर त्याची माहिती वेळोवेळी देण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या – यानंतर चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये काहींनी प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणावर भर देण्याची मागणी केली. त्याशिवाय भोगाळे येथील मंदिराकडे जाणारा रस्ता, मुरादपूर रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. यावर भोसले यांनी निधीची तरतूद करून या कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.

