कोकणामध्ये अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये कलाकार कार्यरत आहेत. अगदी खेळ, नाट्य, नृत्य, शिक्षणापासून ते अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत कोकणवासियांचा डंका पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खेर्डीचा सुपुत्र आणि राष्ट्रीय बलप्रतिभा पुरस्कार प्राप्त राज जीवन खंदारे हा पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये झळकला आहे.
लॉ ऑफ लव्ह या चित्रपटामध्ये त्याने भूमिका साकारली आहे. शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असुन त्याच्यावर सर्व माध्यमातून अभिनंदनाच वर्षाव होत आहे. सध्या राज हा खेड-बोरज येथील ज्ञानदीप कॉलेजमध्ये अकरावीचे शिक्षण घेत आहे. बाल वयातच त्याला अभिनयाची आवड जडल्याने, पुढे याच आवडीचे व्यवसायभिमुख शिक्षण घेण्यासाठी, त्याने बोरीवली येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. २०१४ सालापासून तो अनेक ऑडीशनमध्ये, नाटकांच्या कॅम्पमध्ये सहभाग घेवून कलेचे धडे गिरवत आहे.
२०१८ मध्ये तो त्याला राष्ट्रीय बलप्रतिभा पुरस्कार देखील मिळाला. आतापर्यंत त्याने अनेक शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य पात्राचा अभिनय केला आहे. आई माझं पत्र हरवलं, नेत्रजन्म, आंगण, डोकर्या, प्रेम गुंडाराज, या शॉर्टफिल्ममध्ये लिड व सेकंड लिड अशा प्रकारचा अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे सध्या वेबसीरीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याने कंदी पेढे ही वेबसीरीज तर चरंदास चोर, नारी, माई घाट या चित्रपटात अभिनय केला आहे.
वेदिका फिल्म क्रिएशनने प्रॉडक्शनच्या लॉ ऑफ लव्ह या मराठी चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाल्याने त्याला विशेष आनंद झाला, या चित्रपटाचे निर्माते जे. उदय आहेत, तर चित्रपटाचे दिग्दर्शन सी. एस. निकम यांनी केले आहे. त्याच्या या मराठी चित्रपटातील पदार्पणा संदर्भात सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.