राज्य शासनाने सर्व दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेमध्ये असल्या पाहिजे असे जाहीर केल्यापासून श्रेयवादावरून अनेक पक्षांची कुरघोडी सुरु आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयावर ट्विटरवरुन टीका केली होती. चित्रा वाघ यांनी काही वेळापूर्वी आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो पोस्ट करत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार चांगलाच निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे कि, मराठीला फक्त पाट्यांपुरताच भाव, युवराजच्या पेंग्विनचं इंग्रजीत नाव?”
पुढे एका चित्रात महापौर पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणताहेत की, “साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत. मराठी नामकरण करण्यास नाही” तर दुसऱ्या एका चित्रात एक पेंग्निन आई आपल्या नुकत्या जन्मलेल्या बाळाला म्हणतेय की, “ताईंनी किती छान नाव दिलं आहे तुला Oscar बाळ” वाघ यांच्या या पोस्टमधून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरच थेट निशाणा साधण्यात आला होता.
याला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोजक्या आणि शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिलांची नाव आता चंपा आणि चिवा ठेऊ ! असं त्यांनी म्हटलं आहे. महापौरांच्या या विधानामुळं वाद उफळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना महापौर किशोरी पेडणेकर काहीशा प्रमाणात संतापल्या आणि त्यांनी हे विधान केलं. त्या म्हणाल्या, “आम्ही वाघिणीच्या बछड्याचं नाव वीरा ठेवलंय. तसंच पेंग्विन हे मुलांसाठी एक वेगळं आकर्षण आहे. पण इतक्या खालच्या स्तरावर येऊन तुम्ही टीका करणार असाल तर पुढच्या वेळी आपण चिवा आणि चंपा अशी नावं ठेऊ. तुम्हीच म्हटला आहात ना मराठीमध्ये बारस करून नावं ठेवा मग आता येणाऱ्या हत्तीच्या बाळाचं नाव आम्ही चंपा ठेऊ आणि माकडाच्या बाळाचे नाव चिवा ठेऊ”