रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असलेल्या घरफोड्या, तसेच मालमत्ते विषयीच्या अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व बँका, पतसंस्था, पेट्रोल पंप, सुवर्णकारांची दुकाने तसेच आर्थिक व्यवहारांच्या संबंधित आस्थापनांना तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि दिवस रात्र पाळीसाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दिले आहेत.
ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत, त्या ठिकाणी येणार्या जाणार्या माणसांचा चेहरा स्पष्टपणे दिसेल, त्याचबरोबर वाहनांच्या नंबर प्लेट नीट दिसतील अशा पद्धतीने कॅमेरे लावले आहेत का? याची तातडीने तपासणी करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला दिले गेले आहेत.
राज्यासह जिल्ह्यात ते अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षामध्ये अनेक गुन्हे पोलिसांच्या भीतीमुळे आवाक्यात आले होते. परंतु, कोरोना काळानंतर पुन्हा घरफोडी, लहान मोठ्या चोऱ्या, एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे सोन्याचे दागिने चोरणे, अपघात, अपहरण, असे एक न अनेक गुन्ह्यांनी रत्नागिरीमध्ये सुद्धा हळूहळू डोके वर काढायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे वेळीच या सगळ्या गुन्ह्यांना वाचक बसण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यास मदत होण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने संबंधित आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि तातडीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करायला सांगितले आहे. जेणेकरून पुढील उद्भवणाऱ्या संकटाला सामोरे जाणे शक्य होईल. पोलीस स्थानकामधून, प्रत्येक आस्थापनेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी सुद्धा करण्यात येत असल्याने, अनेक आस्थापनांनी संरक्षणाच्या कारणास्तव या दोन्ही सुविधा त्वरितच कार्यान्वित केल्या आहेत.