मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात झालेल्या राड्याचे वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभर याच प्रकरणाची चर्चा सुरु होती. या मागे पडद्याआडची स्टोरी काही वेगळीच असल्याची चर्चा सुरु आहे. एखाद्या सिनेमात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला असून खेड आणि चिपळूणमध्ये त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या परिसरातील एका महिलेचा विनयभंग करत जबर मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या मुलाला देखील जबरी मारहाण करून कापून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, अशी माहिती पीडित महिलेने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांने अधिकच खळबळ उडाली आहे. तसेच खेड पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही असा थेट आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यानंतरच परशुराम घाटातील राडा घडला असे स्पष्टपणे समोर आले आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार तिचा १७ वर्षीय मुलगा गुरुवारी रात्री घाणेखुंट येथील घराबाहेर मोबाईल घेऊन गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही, म्हणून त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता समोरून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून मुलाला कापून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने आपल्या पतीसह थेट लोटे पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच सख्ख्या भावाला देखील कल्पना दिली. ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांनी देखील तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधला होता.
मेटे मोहल्ल्यात जमाव – या महिलेने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पोलिसांबरोबर आम्ही खेड मेटे मोहल्ला येथे पोहचलो तेव्हा सुमारे ५० हुन अधिक लोकांचा मोठा जमाव त्याठिकाणी हजर होता. माझ्या मुलाला व त्याच्या मित्राला जबर मारहाण करण्यात आली होती. नेमके कारण काय? काय घडले हे विचारताच जमावामधील पुरुष मंडळी चक्क शिवीगाळ करून अंगावर धावून येत होती. माझ्या मुलांकडून काय चूक झाली हे सांगा, मी तुमची माफी मागते, तसेच माझ्या मुलाला देखील मी शिक्षा देईन, असे मी वारंवार विनवणी करत होते. परंतु उपस्थित मंडळी बेभान झाले होते. ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते. पोलीस देखील त्यांना सतत समजवत होते असा सारा घटनाक्रम या महिलेने पत्रकार परिषदेत सांगितला.
जबर मारहाण – जमावातील ६ तरुण चक्क माझ्या अंगावर चाल करून आले. अत्यंत ‘घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत कपडे फाडले, पाठ आणि पोटात जबर मारहाण करत मला चक्क फेकून देण्यात आले. मी जमिनीवर कोसळले, सुदैवाने दगडावर आपटले नाही, अन्यथा माझा जीवच तिथे गेला असता आणि हे सर्व पोलिसांच्या समोर घडत होते. माझा भाऊ हा देखील त्याठिकाणी आला असता त्याला काही लोकांनी पकडून ठेवले आणि जबर मारहाण करत होते. पोलिसांची अतिरिक्त तुकडी देखील त्याठिकाणी दाखल झाली होती. पोलिसांना ही सर्व घटना माहीत आहे, असा दावा या महिलेने पत्रकार परिषदेत केला.
खेड पोलीस ठाण्यात धाव – हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात जाऊन मी रीतसर फिर्याद दाखल केली. ज्या ६ तरुणांनी मला मारहाण केली. त्यांची नावे देखील मी पोलिसांना दिली. पोलिसांनी फिर्याद लिहून घेतली परंतु कारवाई करताना हात आखडता घेतला आहे. ६ पैकी फक्त ३ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य लोकांना अद्याप मोकाट सोडले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पोलिसांच्या समोर हे घडलेले असताना पोलीस कारवाई का करत नाहीत.? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
तर ठिया आंदोलन – आम्ही पोलीस कारवाईची प्रतीक्षा करत आहोत. या प्रकरणात जे कोण आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई पोलिसांनी करावी, ही आमची मागणी आहे. येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहोत. आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. ठिय्या आंदोलन करून थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार आहे. आशा स्पष्ट शब्दात सौ. जमीला शहा व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.