25.8 C
Ratnagiri
Sunday, February 23, 2025

आता वेध रविवारच्या सामन्याचे, चॅम्पियन्स करंडक

बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी...

कामगिरी नियुक्तीने शाळांवर जाणार नाही, कंत्राटी शिक्षक संघटना

पुढील वर्षात कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीबाबत हमी दिली...

प्रधानमंत्री घरकुलाचे १९ हजार ५२५ चे उद्दिष्ट – कीर्तीकिरण पूजार

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला १९...
HomeRatnagiriरत्नागिरीत नागरिक त्रस्त, ७ दिवसांत दुसऱ्यांदा पारा चढला

रत्नागिरीत नागरिक त्रस्त, ७ दिवसांत दुसऱ्यांदा पारा चढला

३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून, रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१) ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सात दिवसांपूर्वी ३७.८ अंशांपर्यंत तो वर चढलेला होता. यंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच जाणवू लागल्या आहेत. आज दिवसभर उष्म्याने रत्नागिरीकर चांगलेच त्रस्त झाले होते. उन्हाच्या फटक्याने हापूसची फळगळ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यंदा जानेवारीपासूनच वातावरणातील बदल जाणवू लागले आहेत. सुरुवातील कडाक्याची थंडी जाणवत होती. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात धुके होते. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे वातावरण कायम होते. दुसऱ्या पंधरवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. दापोलीमध्ये मागील आठवड्यात किमान तापमान १०.५ अंश त्याच दिवशी कमाल तापमान ३५ अंश इतके होते. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी कडकडीत ऊन असे वातावरण होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत.

यंदा १४ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३७.२ अंश नोंदले गेले. त्यानंतर पारा खाली घसरत गेला. याच दिवशी मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात कमाल तापमान ३६ अंश, तर किमान तापमान ११.९ अंश नोंदले गेले. १९ रोजी कमाल तापमान ३२.३ अंश तर किमान तापमान २१ अंश इतके नोंदले गेले. मात्र, आज अचानक पारा ३८.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. सकाळी वातावरणात गारवा होत; परंतु १० वाजल्यानंतर हवेत उष्मा जाणवू लागला आहे. त्यानंतर झळांची तीव्रता वाढत गेली. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून फिरणेही मुश्कील झाले होते. त्यामुळे दुचाकी चालकांसह पादचाऱ्यांची वर्दळ कमी होती. तसेच अनेकांनी डोक्यावर टोप्या घातल्या. रत्नागिरीत कमाल आणि किमान तापमानातील फरक १५ ते २० अंशांपर्यंत जात आहे.

उन्हाच्या तडाख्यामुळे डीहायड्रेशन, उन्हाचा स्ट्रोक बसणे, ताप येणे यासारख्या गोष्टी होत असतात. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, हवामानातील चढ-उतार हा ऋतू बदलाचे संकेत आहेत. हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. हे वातावरण आणखीन दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. तुलनेत यंदा उन्हाचा तडाखा लवकर जाणवू लागल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोकणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे तापमान वाढ जाणवत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular