सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक, गटनेता संजय यादव यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांची भेट घेतली. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. दरम्यान, सोमवारपर्यंत तोडण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी फिरते शौचालयाची (मोबाईल टॉयलेट) सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ठोस ग्वाही मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी संजय यादव यांना दिली. लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाला लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्मल शौचालय उभारण्यात आले होते. हे निर्मल शौचालय सर्वच नागरिकांना अतिशय सोयीचे ठरत होते. शहरात विविध कामानिमित्त येणारे नागरिक, मंगळवारचा भरणारा आठवडी बाजार त्याचप्रमाणे येथील रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यावसायिक व अन्य छोटे मोठे व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक, प्रवासीवर्ग आणि विद्यार्थी यांनाही निर्मल शौचालय हे सोयीचे ठरत होते.
मात्र मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात हे शौचालय बाधित होत असल्याने या निर्मल शौचालयावर प्रशासनाकडून हातोडा फिरवण्यात आल्याने सध्या कामानिमित्त शहरात येणारे ग्रामस्थ, व्यावसायिक, रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यावसायिक, दुकानदार तसेच अन्य सर्वच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे फिरत्या शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांची भेट घेऊन लोकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केली. मुख्याधिकारी कुंभार यांनी सांगितले, नगरपंचायतीचे उपसा मशीन (सक्शन मशिन) बंद पडले आहे. हे मशीन रत्नागिरी जिल्ह्यात दुरुस्त होत नाही. त्यासाठी ते कोल्हापूर किंवा इचलकरंजी या ठिकाणी पाठवावे लागते. लोकांची गैरसोय लक्षात घेऊन आपण तातडीने हे मशीन इचलकरंजी येथे पाठवत असून ते दुरुस्त होऊन आले की आपण निर्मल शौचालय तोडलेल्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट म्हणजेच फिरते शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत

