जिल्हा शासकीय रुग्णालयात कोट ता. लांजा येथील रुग्णाचे वयाच्या ५० व्या वर्षी जिल्हा रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना नेत्रदानाविषयी माहिती दिली आणि त्यांचे नातेवाईकानी नेत्रदानाला समंती दर्शवली. जिल्हा रुग्णालय आणि लायन्स क्लबच्या नेत्रदान विभागाच्या वतीने नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. पाष्टे यांचे नेत्रदानामुळे आता दोन जणांचे जीवन प्रकाशमय होणार आहे.
शनिवारी लक्ष्मण केशव पाष्टे वय ५० यांचे जिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. कोट गावचे सरपंच संजय पाष्टे यांनी व मुलगे व नातेवाइकांनी लक्ष्मण पाष्टे यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला. अंधत्व नियंत्रण समितीच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कानगुले यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदान समुपदेशक राम चिंचोळे, नेत्र चिकित्सा अधिकारी मधुसुदन तावडे, संदीप उगवेकर यांनी रुग्णांच्या नातेवाइकांचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केले.
नेत्रदान प्रक्रिया योग्य वेळेत करण्यासाठी लायन्स नेत्र रुग्णालयचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र भोळे यांनी त्यांची टीम पाठवून नेत्रदान प्रक्रिया करण्यासाठी अनमोल सहकार्य केले. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथील अतिदक्षता विभागातील सर्व परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लायन्स नेत्र रुग्णालय रत्नागिरीचे किशोर सूर्यवंशी व त्यांच्या टीमने जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथील नेत्र विभाग टीमसोबत नेत्रदान प्रक्रिया पार पाडली.
लक्ष्मण केशव पाष्टे यांच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर होऊन, ते प्रकाशमय होणार आहे. पाष्टे कुटुंबीयांनी समाजा समोर एक प्रकारचा आदर्श घालून दिला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी पाष्टे कुटुंबीयांना विशेष धन्यवाद दिले आहेत.