रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. २०२१ मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खर्चाचा हिशोब आणि निविदेची कागदपत्रे मागत असताना, अभियंता यांनी अयोग्य भाषा वापरल्याचा खळबळजनक आरोप उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद ३० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. त्या अभियंत्याला निलंबित करा, अशी मागणी तिवरेकर यांनी केली आहे. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पालिका कार्यालयात कामानिमित्त गेले होते. २०२१ स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जो खर्च करण्यात आला, त्यातील निविदेनुसार कामांच्या तपशिलाची (बायफर्केशन) प्रत त्यांनी अभियंता रोहन डांगे यांच्याकडे मागितली.
आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी तिवरेकर हे चर्चा करत होते, त्यावेळी तिथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यांनी अचानक हस्तक्षेप करत तिवरेकर यांना उद्देशून बोलण्यास सुरुवात केली, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना तिवरेकर यानी सांगितले. ते म्हणाले, ‘मी अभियंत्यांशी बोलत नव्हतो तरीही त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून मला अर्वाच्य भाषेत बोलत धमकावले. नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि झालेल्या कामांमधील त्रुटी समोर यावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे; मात्र, ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा. रत्नागिरीच्या संस्कृतीला हे वर्तन शोभा देणारे नाही.’
नगरपालिकेत सायंकाळी ही घटना घडली तेव्हा, त्याठिकाणी पालिकेचे कर्मचारी, शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नाय आणि अन्य सहकारी नगरसेवक तिथे उपस्थित होते. महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी या घटनेचा निषेध केला असून, पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे तिवरेकर यांनी ठणकावून सांगितले. शहरात उपनगराध्यक्ष आणि बांधकाम अभियंता यांच्यात उडालेल्या शाब्दीक चमकमकीची चर्चा सुरू आहे. याबाबतचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटणार का. याबाबतही रत्नागिरीवासीयांच्यात लागून राहिलेली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
निलंबनाचा प्रस्ताव मांडणार – उपनगराध्यक्षांना दिलेल्या या वागणुकीमुळे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष पेटला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत निलंबनाचा प्रस्ताव मांडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सर्व नगरसेवकांतर्फे केली जाणार असल्याचे तिवरेकर यांनी सांगितले.

