रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथे सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आज गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले. कुधे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात शिबिर सुरू आहे. विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत या उद्देशाने श्रमदानाचे नियोजन केले. नजीकचा गणेशगुळे समुद्रकिनारा कायम पर्यटकांनी गजबजलेला असतो. या किनाऱ्याची स्वच्छता करण्याचे नियोजन केले. आज सकाळी गणेशगुळे समुद्रकिनारा येथे विद्यार्थ्यांनी सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रमदान करून किनारा स्वच्छ केला. प्लास्टिक बाटल्या, खाऊचे रॅपर्स, काचेच्या बाटल्या, थर्माकोल असा विविध प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला.
या श्रमदानाला गणेशगुळे गावच्या सरपंच श्रावणी रांगणकर, पोलिस पाटील संतोष लाड, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत रांगणकर, ग्रामपंचायत कर्मचारी वर्षा लाड यांनी स्वयंसेवकांसोबत श्रमदान केले. त्यांनी मुलांचे कौतुक केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ४२ स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. अनुष्का टिकेकर यांनी सहभाग घेतला. श्रमदानाला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. भालचंद्र रानडे, प्रा. सुयोग सावंत, प्रा. गुरूप्रसाद लिंगायत, प्रा. अजय ठीक, प्रा. सुमेध मोहिते यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना खाऊ दिला.