जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाचे तब्बल ८४ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ८९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसदलाने दिली; मात्र यामध्ये संशयित आरोपी जवळचेच असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. सध्या लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हा काळ खूपच चिंता निर्माण करणारा आहे. घर, शाळा, सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता जपणे अवघड झाले आहे. बरेचदा जवळच्या नात्यातील व्यक्तींकडूनच बालकांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. अनेकांच्या वासनांना अजाण बालके बळी पडत आहेत.
त्यामुळे लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची पालकांची जबादारी वाढली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून तर बाललैंगिक शोषणाच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. अलीकडच्या काळात या घटना वाढू लागल्याचे दिसत आहे. मुलांना घरातील जवळच्या नात्यातील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सोपवले जाते; मात्र, ही जवळची वाटणारी माणसेच विश्वासघात करतात आणि निष्पाप बालके त्यांच्या अत्याचाराचे बळी ठरतात. दहा महिन्याच्या कालावधीत असे ८४ गुन्हे जिल्ह्यात घडले आहेत. या आरोपीवर ३५४ आणि ३७६ कलमाखाली तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.