विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले जि.प.चे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, दूसरे एक इच्छूक उमेदवार आणि जि.प. चे भुतपूर्व उपाध्यक्ष उदय बने आणि भाजपचे नेते, माजी आ. बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्यावर झाली याचा तपशिल उपलब्ध नसला त्तरी आगामी निवडणुकांमध्ये रत्नागिरी मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आणि त्यासाठी सक्षम उमेदवार रिंगणात उतरवावा याबाबत चर्चा झाल्याचे कळते. या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असली तरी त्याबाबत अधिकृत माहिती देण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. निवडणुकीच्या युद्धात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
शिवसेना फुटली – अडीच वर्षांपूर्वी राज्यात भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. यात. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्यासोबत काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेले. परंतु आजही शिवसेनेचा ठाकरे गट ठामपणे उभा आहे. म ातोश्रीसोबत एकनिष्ठ आहे. लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आणि उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना या मतदारसंघात बारा हजारांचे लीड मिळाले.
बाळ माने सज्ज ? – विधानसभेच्या दरम्यान, निवडणुकीत ३ वेळा पराभवाला सामोरे जावे लागलेले भाजपचे नेते माजी आ. ‘बाळ माने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यासमोर ३ पर्याय आहेत. ५ वर्षांच्या युतीमुळे उबाठा गटातील अनेकांशी बाळ माने यांचे जवळचे संबंध आहेत. यातूनच ते उबाठात प्रवेश करू शकतात, भाजपातच राहून आणखी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात किंवा अपक्ष उभे राहण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर उबाठामधील इच्छुक राजेंद्र महाडिक, उदय बने यांच्याशी बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जाते. येत्या २-४ दिवसात वेगाने राजकीय घडामोडी होत चित्र अधिक स्पष्ट होईल असा अंदाज आहे.