येथील बाग समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची १४० अंडी सापडली. वनपाल संतोष परशेट्ये यांच्या उपस्थितीत ही सर्व अंडी संवर्धित करण्यात आली आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही गुहागरच्या समुद्रावर अंडी मिळण्याचा हंगाम महिनाभर लांबला आहे. गेल्यावर्षी गुहागरच्या केंद्रात २०० हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची २३ हजारांपेक्षा जास्त अंडी संवर्धित केली होती. या वर्षीही मोठ्या संख्येने ऑलिव्ह रिडले कासवांची हजारो अंडी संवर्धित करता यावीत अशी तयारी वनविभाग आणि कांदळवन कक्षातर्फे केली जात आहे.
हवामानामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पहिले घरटे सापडले. यावर्षीही बदललेल्या हवामानामुळे हंगाम लांबत चालला आहे. १६ डिसेंबरला पहिले घरटे सापडल्यावर पुढे दररोज घरटी सापडतील, असा अंदाज होता, मात्र गेल्या तीन दिवसांत एकही घरटे सापडले नाही. २० डिसेंबरला सकाळी पावसाचा हलका शिडकाव झाल्याने दुसरे घरटे मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. यावर्षी दिवाळीनंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षाने गुहागरमधील कासव संवर्धन केंद्राला अधिक बळकटी दिली. कोरोनापूर्वी ७.५ किमीच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी केवळ २ कासवमित्रांची नियुक्ती केली होती.
यावर्षी संजय भोसले, शार्दुल तोडणकर, रवींद्र बागकर, कुसुमाकर बागकर, विक्रांत सांगळे, दिलीप सांगळे या कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अंडी संवर्धन प्रक्रिया व पर्यटकांशी संवाद साधताना घ्यायची काळजी याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. आता वन विभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि गुहागरमधील निसर्गस्नेहीना ऑलिव्ह रिडले कासवांची प्रतीक्षा आहे. दरवर्षी ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मादी कासवे अंडी घालण्यासाठी येतात.