पंढरपुरामध्ये याही वर्षी संचारबंदी असल्याने भाविकांना प्रवेश बंद होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा संपन्न झाली. आज पहाटे मंदिरात अडीच वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुंबई सलग पडणारा मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने, याही वर्षी ते मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं उद्धव ठाकरे यांचे हे द्वितीय वर्ष ठरणार आहे.
प्रत्येक वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारी नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना मिळाला आहे. यावेळी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्ती रसामध्ये, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरळीत होऊ दे. यासाठी देवा, आता सगळ्या देशावरचे कोरोनाचे संकट नष्ट करून टाक. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, पांडुरंगाच्या चरणी असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्या वेळी घातले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरपरिसर फुलांनी सजविण्यात आलेला. तसेच संपूर्ण मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केल्याने, विठ्ठल मंदिर परिसर प्रकाशमान झाले होते. परंतु, यंदाही वारकऱ्यां विनाच आषाढी एकादशीची महापूजा पार पडली. संचारबंदी लागू केल्याने, सर्वत्र शुकशुकाट होता. गेली अनेक वर्षे हजारो-लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीतीमध्ये माऊलींच्या पादुका प्रवास करून पंढरपूरमध्ये येत असत, परंतु कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल होत आहेत. आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात उपस्थित होते.