मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात सहभागी होत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. दीड महिन्यापूर्वी आम्हीही ५० थरांची हंडी फोडली असं शिंदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, हे सर्व बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे. तसेच यापुढे हे थर वाढत जाणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. गोविंदाप्रमाणे पुढील उत्सव साजरा करताना मोठ्या उत्साहात व काळजी घेऊन साजरे करा असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक द्वंद्व सुरु झाल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीही ५० थरांची हंडी फोडली असे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर, आदित्य ठाकरेंनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, तुम्ही ५० थर लावले की त्यांचा थरकाप झालाय हे सर्वांना माहित असल्याचा टोला लगावला आहे. सण आहे त्यामुळे राजकीय टीका करणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु, असं फडणवीस म्हणाले. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल. आमची दहीहंडी ही वेगळी असते. त्यांची दहीहंडी कोणती आहे ते माहिती नाही. निवडणुकीत कळेल, असा इशारा परब यांनी दिला आहे. त्यावर ‘मी अजूनपर्यंत ८ आणि ९ थरांचीच दहीहंडी पाहिली आहे. ५० थरांची दहीहंडी मी पहिल्यांदाच ऐकतेय. बहुदा ते स्पेनला गेले असतील, असा टोला परब यांनी लगावलाय.