शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर मुद्दामहून कारवाई केली जात असल्याची टीका वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीनं मोठी कारवाई करत प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची टाच आणली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंट मधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या असून या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. ठाकरे साहेबांच्या मेहुण्याच्या अकाउंट मधून नक्की कोणाकोणाला पैसे गेलेत ते आता समोर येईल, घोटाळेबाजांना सोडणार नाही”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ईडीच्या या कारवाई नंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ‘आगे आगे देखो, होता है क्या’ असं म्हणत सूचक इशाराच दिला आहे. ‘आगे आगे देखिए होता है क्या ! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. मागील लेख जोखा बघायला गेल तर, गेल्या सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? कर्मचाऱ्यांच्या नशिबी केवळ आत्महत्या ! आणि आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!’ असं ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत घणाघाती टीकाही केली आहे.