रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावामध्ये सर्व डोंगरच खाली खचून खाली आल्याने, त्या दरडीखाली अख्खा गाव दबला गेला आहे. यामध्ये जवळपास ४० जणांचा मृत्यू ओढवला असून, बाकीच्यांचे शोध घेण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. अजून ७० ते ८० जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन तेथील नागरिकांना मानसिक आधार दिला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्यावर ओढावलेला प्रसंग खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा, खंबीर बना. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांना आधार दिला.
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हवाई मार्गाने मुख्यमंत्री तळिये गावामध्ये पोहोचले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, रत्नागिरीचे पालक मंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी इत्यादी उपस्थित होते.
मातीचा ढीग उपसण्याचे काम वेगवान पद्धतीने सुरू असून, स्थानिक प्रशासनासह अनेक रेस्क्यू टीम तळीयेमध्ये मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला खूप वेग आला आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारने देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या तसेच जखमी झालेल्या लोकांना मदत जाहीर केली आहे.