तौक्ते वादळानंतर मुख्यमंत्र्यासकट अनेक पक्षाच्या सदस्यांनी कोकणाचा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याचा पंचनाम्याचा अहवाल मिळाल्यावर निसर्ग वादळाच्या वेळी झालेल्या नुकसानीची जशी मदत केली होती, त्याप्रमाणेच यावेळीही शासनाकडून मदत पुरवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकसान झालेल्या सर्वाना भरपाई दिली जाणार आहे, कोणीही मदतीशिवाय वंचित राहणार नसल्याचेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची वृक्ष संपदा असल्याने तौक्ते वादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंबा, काजू, नारळ, पोफळी उत्पादन येणाऱ्या झाडांचे नुकसान झाले आहे. सर्व फळांचे पडून जाऊन मोठ्या नुकसानीला बागायतदारांना सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या गावांना सुद्धा या वादळाचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे कशी परिस्थिती निर्माण होते याची पूर्वकल्पना असल्याने शासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन टीम, सगळीकडे तैनात करण्यात आली होती. आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष पुरविण्यात आलेले होते.
मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्ताना एक भरीव मदत मिळण्याचा दिलासा मिळाला होता. पंचनामे अजूनही काही प्रमाणामध्ये सुरु आहेत. प्रत्येक वेळी कोणत्याही नुकसान भरपाईच्या वेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्याची तक्रार जनता करत आहे, पंच्नाम्याम्ध्ये राहिलेल्या त्रुटींमुळे नुकसानग्रस्ताना कुठे कमी प्रमाणात तर कुठे अधिक प्रमाणात मदत मिळाल्याचे निष्पन्न झाले. निसर्ग वादळामध्ये मिळालेली नुकसान भरपाई पुरेशी नव्हती असे अनेक पक्षांनी निवेदनामध्ये म्हंटले आहे. निसर्ग वादळाच्या वेळी आणि तौक्ते वादळाच्या वेळी वेगवेगळे निकष पडताळून पाहून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाची मागणी जनतेने शासनाकडे केली आहे.