भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित कोकण विभागातील एक प्रमुख तटरक्षक कार्यालय आहे. त्या द्वारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर लक्ष ठेवले जाते. या ठिकाणी सेवा बजावत असलेल्या कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यसेवेसाठी चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार केला आहे. भारतीय तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक तज्ज्ञ सल्ला आणि उपचार अशा सुविधा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला पुरवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे सशस्त्र दलाच्या समुदायाला आरोग्यसेवा उपलब्ध आवश्यक होतील, आणि नागरी-लष्करी आरोग्य सहकार्याच्यादृष्टीने एक नवा आदर्श निर्माण होईल.
या कराराअंतर्गत विविध तज्ज्ञ विभागांतील वैद्यकीय सल्ला, आरोग्यसुविधा आणि उपचार सेवा केंद्र शासन आरोग्य योजना (CGHS) मुंबईतील दरांमध्ये उपलब्ध होतील. या सुविधांचा लाभ सेवा बजावत असलेल्या तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना, संरक्षण मंत्रालयाशी संलग्न नागरी कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना, माजी सैनिकांना आणि त्यांच्यासोबतच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. हा करार कमांडिंग ऑफिसर कमांडंट शैलेश गुप्ता आणि लोकमान्य हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक रवींद्र परदेशी यांच्यामध्ये करण्यात आला. करार स्वाक्षरीवेळी स्टेशन वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपान जीने आणि साधना फाउंडेशनच्या डॉ. समिता गोरे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ तसेच हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.