नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अथनि मासेमारीला सुरुवात होते. पावस खारवीवाडा परिसरातील मच्छीमारांनी सोमवारी (ता. १९) सायंकाळी वाजतगाजत रनपार येथे समुद्रात नारळ अर्पण केला. बा समुद्रा शांत हो… असे साकडे घालत मच्छीमारांनी आमच्या व्यवसायाला गती दे, अशी आशा व्यक्त केली. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर मच्छीमारांना समुद्रामध्ये जाण्यास बंदी असते. माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे दोन महिन्यांचा बंदी कालावधी असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात करण्याची प्रथा आहे; मात्र गेल्या काही वर्षात १ ऑगस्टपासून मासेमारी व्यवसाय सुरू होतो; मात्र बहुसंख्य मच्छीमार मुहूर्त नारळी पौर्णिमेलाच करतात.
यंदा ऑगस्टच्या सुरुवातीला वादळी वातावरण होते. त्यामुळे मच्छीमारीत अडथळा येत होता. पौर्णिमेला समुद्र शांत झाला असून काहींनी काल रात्रीपासून समुद्रात जाण्यास सुरुवात केली आहे. पावस बाजारपेठेतील खारवीवाडा परिसरातील मच्छीमार कुटुंबांनी काल नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. वाजतगाजत झिम्मा, फुगडी आदींचा आनंद लुटत रनपार समुद्रकिनारी नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली. किनाऱ्यावरून सर्व मच्छीमारांनी सागराला प्रार्थना केली आणि नारळ अर्पण केला. त्यानंतर अनेक मच्छीमारांनी मच्छीमारी बोटी समुद्रात नेण्यास सज्ज केला.
गणपतीनंतर मच्छीमारीला वेग – पावस, पूर्णगड, गोळप, गावखंडी, गावडे आंबेरे या किनाऱ्यावरील मच्छीमार व्यावसायिक गणपतीनंतरच मोठ्या प्रमाणात नौका समुद्रात सोडतात. त्यामुळे आतापासून त्या मच्छीमारांनी नौका समुद्रात नेण्याची तयारी सुरू केली आहे.