जसजशी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे तसतशी गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली गोरगरीबांच्या घरकूल योजनेतील अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे. त्यामुळे घरकूल बांधकामसाठी घेतलेली उधार-उसनवारी परत करणे लाभार्थ्यांना शक्य होत आहे. यामुळे अर्धवट राहिलेले घराचे बांधकाम पूर्ण करीत घरकूलाच्या माध्यमातून गोरगरीबांच्या आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. घरकुलांच्या रखडलेल्या अनुदानाच्या रक्कमेबाबत आणि त्यातून सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या होत’ असलेल्या परवडीकडे शासनासह प्रशासन लक्ष वेधण्यात आले होते. अनेक स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासह शासनस्तरावर रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न आपल्या परीने सातत्याने मांडला होता.
घरकूल योजनेतून लाभार्थ्याला घर बांधकाम ासाठी साहित्य व मजूरी असे मिळून सुमारे एक लाख ४० हजार रूपयांचे शासन अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी प्रशासकीय मंजूरीनंतर घराचे बांधकाम केले आहे. नातेवाईक, दुकानदार वा अन्य ठिकाणी उधार उससनवारी करीत अनेक लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम आधीच पूर्ण केले आहे. काही लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्याचवेळी ज्यांनी घरकुल बांधकामासाठी मानवतेच्या भावनेतून आधी आर्थिक मदत केली आहे त्यांच्याकडून उसनवारीच्या पैशाच्या मागणीसाठी स्वाभाविक तगादा लावला जात होता.
मात्र घरकूल योजनेतील अनुदानाच्या अनेक हप्त्यांची रक्कमचं शासनाकडून अनेक महिन्यांपासून मिळालेलीच नसल्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांसमोर उधार-उसनवारी भागवायची कशी असा प्रश्न उभा ठाकला होता. यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र आता विधानसभा निवडणूकीची बिगुल वाजणार असल्याने शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रखडलेली अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे. आगामी निवडणुक ही या लाभार्थ्यांसाठी करिष्मा ठरली आहे.