रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढलेला संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून, आत्ता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ५० च्या आतमध्येच आहे. त्यामुळे अनेक खाजगी कोरोनाची उपचार केंद्रे सुद्धा बंद करण्यात आली आहेत. तरी सुद्धा कोरोना अजून पूर्णत: संपुष्टात आला नाही आहे. त्यामुळे कोरोनाचे शासनाने आखून दिलेले नियम हे सगळ्यांसाठीच बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिली आहे.
कोविड काळापासून ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
पुढे ते म्हणाले आहेत कि, कार्यालय परिसरामध्ये नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सर्व आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असून, त्याबाबतचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचार्यांकडून प्राप्त करून घ्यावे.
या कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण आल्यास संबंधितांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून विशेष शिबिर आयोजित करावे. सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, याची खातरजमा करून घ्यावी. त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये कोठेही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय, खाजगी आस्थ्पनामध्ये कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय आढळली तर त्या व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
संबंधितांना त्याबाबतची अधिकृत पावती देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तीवर फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना अजून पूर्णत: संपुष्टत आलेला नसल्याने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.