जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हर घर दस्तक अभियान राबविण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले असून. लसीकरणासाठी प्रत्येकांपर्यंत पोहचा, यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घ्या. जे लसीकरणासाठी तयार नसतील त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्या आणि जिल्हयाचे लसीकरण पूर्ण करा, असे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह मधील बैठकीमध्ये त्यांनी लसीकरणा संदर्भातील हर घर दस्तक अभियानांच्या जिल्हा कृती दलाबद्द्ल माहिती दिली. हर घर दस्तक अभियान ०३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये इत्यादी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, कोणत्या भागात किती लसीकरण झाले आणि किती शिल्लक आहे यासाठी लसीकरणासंदर्भातील गावनिहाय यादी मागवून घ्या. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी असेल, त्या गावांवर, ठिकाणावंर लसीकरणासाठी भर देणे गरजेचे आहे. आवश्यक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सामाजिके कार्यकर्ते यांची आवर्जून मदत घ्या आणि जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
ते म्हणाले पहिल्या डोसचे प्रमाण चांगले असून जे राहिलेले आहेत त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्या. दुसऱ्या डोससाठी आवश्यक माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यानुसार तिथे शिबीरे भरवून दुसरा डोसचे लसीकरणावर पूर्ण करण्यावर भर द्या. या सर्व गोष्टींमध्ये ग्रामकृतीदल, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्येकर्ते यांची आवश्यक ती मदत घ्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी यावेळी लसीकरणांसदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची आणि या मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.बी.एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.