रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने पुन्हा उघडली होती. दोन ते अडीच वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे योग्य वेळी अशी पाळेमुळे खोल रुतण्याआधीच उखडून टाकणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सावर्डे आणि फुरूस आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये अशा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे कानावर आले आहे. हे बिना पदवीचे डॉक्टर रुग्णांना कोणत्याही आजारावर औषध द्यायला पुढे मागे बघत नाहीत. गरीब रुग्णांची अशा डॉक्टरांकडून लुट होत आहे. औषधाचे अवाच्या सव्वा पैसे आकारून ते रुग्णांना आर्थिक रित्या लुटत आहेत. त्यामुळे या बोगस डॉक्टरांवर वेळीच कारवाई करण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी, येत्या काळामध्ये दरमहा तालुकानिहाय ५ डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी होणार असल्याचे याबाबत झालेल्या बैठकीत संबधित समितीला निर्देश दिले आहेत. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली.
आतापर्यंत जिल्हयात बोगस डॉक्टरची १३ प्रकरणे नोंदली आहेत. यात वेगाने कामकाज करुन ती अंतिम करावीत तसेच इतर बाबतीत आगामी काळात अधिक सतर्कता बाळगून कारवाईची कामगिरी करा असे ते म्हणाले.
पण सगळीकडे चर्चा मात्र या गोष्टीची होत आहे कि, एवढा बिनधास्तपणा या बोगस डॉक्टरांमध्ये कुठून आला! त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही? त्यांच्यावर नक्की कोणाचा वरदहस्त आहे, जे एवढे बिनधोकपणे आपले बोगस दुकान उघडून बसले आहेत? त्यामुळे प्रशासनच त्यांना पाठबळ देत नाही न! अशी कुजबुज सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.