दापोली तालुक्यातील कर्दे येथे वाई जि. सातारा येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्व गटांगळ्या खाऊ लागले. त्यातील चार महाविद्यालयीन युवकांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे, तर त्यातील एकजण बेपत्ता आहे. सौरभ घावरे वय १९, रा. पाचगणी बेपत्ता तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी स्पीड बोट मागविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एकसार गावातील कार्तिक घाडगे वय २०, यश घाडगे वय १९, दिनेश चव्हाण वय २०, अक्षय शेलार वय १९, कुणाल घाडगे वय ३० व पाचगणी येथील सौरभ घावरे वय १९ असे सहा महाविद्यालयीन युवक शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या गावातून तीन दुचाकी घेऊन कोकणच्या पर्यटनासाठी निघाले. रविवारी दि. ९ रोजी ते सकाळी हर्णै येथे दाखल झाले. त्यांनी बाजारातून काही मासे विकत घेतले आणि ते एका हॉटेलमध्ये शिजवून घेतले.
जेवण करून दुपारी १२ वाजता ते कर्दे येथे आले. तेथे त्यांनी किनाऱ्यावर तंबू उभारला व पाच जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. एकजण किनाऱ्यावर थांबला होता. ते पाच जण पोहायला गेले तेव्हा भरती संपून ओहोटी लागली असल्याने ते ओहोटीच्या पाण्याच्या करंटमुळे समुद्रात ओढले जाऊ लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. दुपारी एकच्या सुमारास हि घटना घडली.
यांची ओरड ऐकून मकरंद तोडणकर, ओंकार नरवणकर व ग्रामस्थांनी दोऱ्या, बोया घेऊन समुद्राकडे धाव घेतली. सरपंच सचिन तोडणकर यांनी लाईफ जॅकेट आणून दिली. त्यानंतर दोऱ्या टाकून चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. सौरभ घावरे हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात आतमध्ये वाहून गेला. कर्देचे सरपंच सचिन तोडणकर, उपनिरीक्षक विलास पड्याळ, हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे व त्यांचे सहकारी सौरभचा शोध घेत आहेत.
महाविद्यालयीन युवक ज्या ठिकाणी पोहायला गेले होते, त्या भागाला चाळण असे म्हणतात. त्यामध्ये हे युवक अडकले गेल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते. या समुद्रकिनारी अद्याप साहसी पर्यटन सुरू झाले नसल्याने स्पीड बोट सुरू झालेल्या नसल्याने मदत मिळण्यास विलंब झाला.