सध्याच्या धक्काधक्कीच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत. संवादासह, डिजीटल, ऑनलाइन व्यवहारासाठी मोबाइलचा वापर काळाची गरज बनला आहे. अशातच नामांकित व आघाडीच्या काही कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज दर वाढविले आहे. त्यामुळे सर्वसाम ान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. घरोघरी प्रत्येकाकडे मोबाइल असल्याने रिचार्ज महागल्याने मोबाईल रिचार्ज साठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. कंपन्यांनी कॉल आणि डाटांचे दर वाढविल्याचा फटका नोकरदारच नव्हे; तर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वच नेटकरी ग्राहकांना बसला आहे. टेलीकॉम कंपन्यांनी मासिक, त्रैमासिक व वार्षिक रिचार्ज प्लानचे दर वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक चणचणीत टाकले आहे.
मोबाइल ही आजच्या घडीला शोभेच बाहुलं म्हणुन नव्हे तर काळाची गरज असलेली वस्तू आहे. नेमके हेच हेरून सर्वच कंपन्यांनी रिचार्जचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले. रिचार्ज करून देखील नेटवर्कची समस्या उद्भवत आहे. यामुळे, मोबाइल धारकांची लूट होत आहे. सुरुवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः कोविडमुळे झालेल्या टाळेबंदी पासून मोबाइल आणि ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थीसुद्धा स्मार्टफोनचा आणि इंटरनेटचा वापर करतात.
कार्यालयीन कामासाठी चाकरमान्यांना, शिक्षकांना माहिती टाकण्यासाठी, शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणीसाठी स्मार्टफोन आणि डाटाची गरज भासते. वीजबील दरवाढी पाठोपाठ रिचार्जचे दरही आपसुकच वाढले आहे. खरंतर ग्राहक वाढताच नेटवर्क सेवा ढासळली आहे. तरी देखील कंपन्यांकडून सातत्याने रिचार्ज महाग केला जातो. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरूण – तरूणींना याची झळ नक्कीच बसणार आहे. त्यामुळे या खासगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीवर शासनाने अंकुश ठेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.