23 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeChiplunबिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख

सह्याद्री खोऱ्यात पायथ्याशी असलेल्या बहुतांशी गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळून येतो.

कधी बिबट्याने तर कधी रानगव्याने हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात अधूनमधून घडत आहेत. या अनुषंगाने आता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबास देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत वाढ केली आहे. या रक्कमेत आता २५ लाखांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी हद्दीत आठजण गंभीर जखमी झाले आहेत; मात्र मृत्यूची घटना एकही घडलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८२४८.८ चौरस किलोमीटर आहे. त्यातील वनविभागाचे क्षेत्र ९६.०२ चौरस किलोमीटर आहे. हे बहुतांशी क्षेत्र सह्याद्रीच्या कुशीत असून, या भागात तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या कमी झाल्याने प्राण्यांनी मोर्चा शहरांकडे वळवला आहे. भुकेने व तहानेने व्याकूळ झालेले बिबटे, माकड तसेच खाडीकिनाऱ्यावरील भागात मगर यासारखे काही जलचर प्राणी आता मनुष्यवस्तीकडे वळले आहेत.

अशा घटना नियमित घडू लागल्याने मानव व वन्यजीव हा नवा संघर्ष घडू लागला आहे. बऱ्याचदा मानवी हस्तक्षेप झाल्यानंतरच हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील पाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले असले तरी मृत्यू झाल्याची घटना एकही नाही; मात्र रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांना पाच लाख रुपये, नंतर दहा लाख रुपये मदत देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करून ही रक्कम २० लाखांपर्यंत नेली होती; मात्र, नव्या धोरणानुसार २५ लाख रुपये भरपाई म्हणून दिले जाणार आहेत.

भरपाई म्हणून धनादेश आणि ठेव – वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी मदतीची रक्कम देताना १० लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात. इतर रक्कम मुदतठेव स्वरूपात मृताच्या वारसाला दिली जाते. ही रक्कम पाच-पाच वर्षांच्या टप्प्याने काढण्याची परवानगी असते.

प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मदत – बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड, नीलगाय यांच्याकडून मानवी हल्ला झाल्यास आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते याशिवाय पशुधनाचीही हानी झाल्यास मदत देण्यात येते.

हल्ले कधी थांबणार? – जिल्ह्यात पाच वर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही; मात्र चिपळूण तालुक्यातील फुरूस येथील तरुण सतीश जाधव याच्यावर १८ जुलै २०२२ रोजी रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. जनावरे चरताना हा प्रकार घडला. या कुटुंबाला १५ लाखांची मदत देण्यात आली.

जखमी, अपंगत्वास मदत मिळते का ? – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च दिला जातो; मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा ५० हजारांपर्यंत प्रतिव्यक्ती आहे. शक्यतो औषधोपचार शासकीय जिल्हा रुग्णालयात अथवा शासकीय ग्रामीण रुग्णालयात करावा.

हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल – वन हेल्पलाइनचा ‘टोल फ्री’ क्रमांक १९२६ कार्यरत झाल्यापासून तो अनेक प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. २४ तास सेवा असलेल्या या हेल्पलाइनचे मुंबईत नियंत्रण कक्ष आहे. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर या वनविभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास त्याची माहिती ४८ तासांत वनविभागाला किंवा पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे.

बिबट्याचा सर्वाधिक वावर या भागात – जेथे वाघाचा अधिवास आहे तेथे शक्यतो बिबट्या जास्त वेळ थांबत नाही. त्यामुळे सह्याद्री खोऱ्यात पायथ्याशी असलेल्या बहुतांशी गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळून येतो.

RELATED ARTICLES

Most Popular