गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. यापुढेही आरवलीच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले. निर्मल ग्रामपंचायत आरवलीच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या आणि समस्यांचे निवेदन आमदार शेखर निकम यांना दिले. ग्रामीण पातळीवरील पाण्यासह विविध प्रश्नांवर ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर आमदार निकम यांनी तत्काळ ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीमुळे गावच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविता येतील.
गावाच्या प्रगतीचा विचार करता, पुढील काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत बाबींवर अधिक भर दिला जाईल, असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला दिलीप सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, सरपंच नीलेश भुवड, पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी, सुशील भायजे, शेखर उकार्डे, बंडूशेठ पाटणकर, जाकीर शेखासन, सुभाष गुरव, कृष्णा भोसले, स्वाती भुवड, गजानन सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल – निर्मल ग्रामपंचायत आरवलीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार निकम यांनी येथील पुढील काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत बाबींवर अधिक भर दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे भविष्यात गावातील पायाभूत सुविधा मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.