जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांत काँग्रेसची ताकद निर्माण करून ती वरिष्ठांनासुद्धा दाखवली पाहिजे तरच आपली दखल घेतली जाईल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्षाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभेमध्ये उमेदवारी द्यावी. तशी उमेदवारी मिळाल्यास जीवाचे रान करून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा ठराव तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आला. आपापसातले मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस पक्ष कसा वाढेल, संघटन कसं वाढेल, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी सर्वांनी बांधलेले राहून तळागाळातील लोकांच्या गाठीभेटी घेत बूथबांधणी करायला हवी. यासाठी पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटात संघटना मजबूत करण्यासाठी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे, असे प्रतिपादन कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांनी केले. शहरातील काँग्रेस कार्यालयात तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बेटकर म्हणाले, देशातील ‘महत्वाचा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडे पाहिले जाते; मात्र कोकणात काँग्रेसला पाहिजे तशी उभारी अजून मिळाली नाही.
त्यामुळे आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढवूया. गावागावात आणि वाडीवस्त्यावर जाऊन काँग्रेसची विचारधारा सांगत कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा देण्यासाठी सर्व पदाधिकाराने एकजुटीने काम करू आणि काँग्रेसचे संघटन बळकट करूया. या वेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीसंदर्भात आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांपर्यंत नेते पोहोचले नाहीत – तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी पंचायत समिती गणात संपर्क दौरा सुरू केल्याचे सांगितले. काही गावांतून भेटीगाठी घेताना जुने काँग्रेसचे कार्यकर्ते यांची भेट घेत होते आणि ते अजूनही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहेत; मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्यापर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले.