31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...
HomeRatnagiriबीएसएनएल तुटलेल्या केबलची जोडणी - पालिकेचे ठेकेदाराकडे बोट

बीएसएनएल तुटलेल्या केबलची जोडणी – पालिकेचे ठेकेदाराकडे बोट

सुखी संसाराचे एक सूत्र असतं, एकाने विस्कटलं तर दुसऱ्याने आवरायचं, एकाने मोडलं तर दुसऱ्याने जोडायचं… अशी ही ललितरम्य स्वप्नाळू आणि आशावादी भाषा साहित्यात अथवा कौटुंबिक नाट्य-मालिका यात शोभणारी. पण, मोठ्या शहरांसह रत्नागिरीसारख्या छोट्या शहरांमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचा कारभार मात्र आधी उल्लेख केलेल्या या संसाराच्या सूत्रानेच चालतो. नुकतीच ‘बीएसएनएल’ची तोडलेली केबल आणि त्याची सुरू असलेली जोडणी यामुळे हा पडताळा आला. सरकारचे एक खाते रस्ते उखडते, गटारे खोदते, त्यातून पाईपलाईन असो अथवा जमिनीखालून जाणाऱ्या टेलिफोन आदीच्या तारा असोत, या तोडून टाकल्या जातात.

आता सरकारी खात्यानेच त्यात तोडल्यामुळे सरकारचे बिचारे दुसरे खाते काय करणार? बरे, याची दाद मागायला गेलं तर सरळ कंत्राटदाराकडे बोट दाखवले जाते. मात्र यात ससेहोलपट होते ती सामान्य नागरिकांची. एकमेकाला खणण्यात, तोडण्यात आणि जोडण्यात सहकार्य करतात. स्वाभाविकच खात्यांचा हा संसार सुखाचा होतो. जनतेला ताप होतो तो होतोच. शहरातील जेलनाक्यापासून खाली मुख्य मार्गावरील गटार खोदाईचे काम पालिकेने केले. जेसीबी येथे अतिशय बेजबाबदारपणे चालवण्यात आला. बीएसएनएलसह अन्य कंपन्यांच्या ब्रॉडबॅण्डच्या लाईन आहेत याचा विचार न करता खोदाई केल्याने केबल तोडल्या. तोडलेल्या केबल रातोरात चोरीला गेल्यामुळे शहरात बीएसएनएलचे लॅण्डलाईन आणि ब्रॉडबॅण्ड सेवा गेली दोन दिवस ठप्प झाली होती. पालिकेने जेसीबी चालकाला काळजीपूर्वक खोदाई करण्याच्या सूचना म्हणे दिल्या होत्या.

खोदाई करताना बहुतेक त्या फक्त कानावरून गेल्याचे वाटते. पावसापूर्वीची तयारी म्हणून पालिकेने शहरात गटारे खोदून सफाई आणि दुरुस्ती अर्थात मोडतोडीचे काम हाती घेतले आहे. यात गटारांच्या बाजूने असलेल्या भूमिगत वाहिन्यांसह बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड केबलही आहे, त्याचीही मोडतोड झाली. शहरात विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना याद्वारे ब्रॉडबॅण्ड सेवा असल्याने सगळ्यांना त्याचा फटका बसला. दोन दिवस उद्धार झाला. मोडतोड करणारे दुसरे काही करू शकत नव्हते. अखेर बीएसएनएलने जोडकाम सुरू केले. या खात्याला आपल्या केबलमुळे काय काम सुरू राहते आणि काय अडते याची चांगली जाणीव असल्यामुळे त्यांनी अल्प कर्मचाऱ्यांच्या आधारेही जोडकाम लवकर करून दिले. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आणि सरकारी खात्यांचा पर्यायाने पालिका आणि बीएसएनएलचा संसार पुन्हा सुरळित सुरू झाला।

RELATED ARTICLES

Most Popular